Wednesday 4 June 2014

तुझ्या माझ्या संसाराला..

माझीच एक कविता कित्येक दिवस मनात घर करुन बसली आहे. दोन-तीन वर्षांपुर्वी भाऊबीजेला मामाकडे गेलो होतो. येताना अशाच एका ठिकाणी फोटो काढावेत म्हणून थांबलो. अस्ताला जाणाऱ्या सुर्याचा नितळ गुलाबी प्रकाश आणि समुद्रावरुन लाटांची गाज घेउन येणारा सांजवारा. क्षणभर माघारी जाऊच नये असं वाटलं. समोर माळ अगदी शांत पसरला होता. आपल्याच श्वासांचा आवाज त्या आनंदाचा विरस करावा.

मी एकटक क्षितिजाकडे पाहत होतो इतक्यात कोणाचीतरी चाहुल लागली. एक जोडपं विसव्यासाठी तिथल्या दगडावर बसलं होतं. दैन्याचं इतकं हसरं चित्र मी तोपर्यंत बघितलं नव्हतं. त्याने एक जागोजागी फाटलेली लुंगी आणि तसाच सदरा घातला होता. आणि तिचाही पोशाख त्याला 'साजेसा'च होता. दोघही आयुष्यातील वादळांना तोंड देत खंगली होती. पण त्या रापलेल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्येही समाधानाचा विलक्षण आनंद होता. मला 'त्याने' मोळी उचलायला हाक मारली आणि मीही सहजच गेलो.

    कदाचित पुन्हा कधीही त्यांना भेटण्याचा योग येणार नाही. आणि भेटले तरीही आम्ही एकमेकांना ओळखणारही नाही. आजवर कित्येकांनी त्यांना मदत केली असेल माझ्यासारखी. लक्षात राहण्यासारखं काय होतं त्यांच्यात? काहीतरी होतं खरं.

ती कविता. त्यांची कविता.

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं

तेच तेच लाडिकपण 
अन् लटका रुसवा

एक घास तुझा 
तेवढाच एक माझा

एक छोटंसं घरकुल
अन् त्यात काही स्वप्नं 

नात्यांची बाग अन् 
प्रेमाचे कुंपण

तुझ्या माझ्या संसारात
कितीक स्वप्नं अन् बऱ्याच अपेक्षा
आणखी काय हवं?

हे सर्व नसतानाही 
तुझ्या माझ्या संसारात हवी दोन मनं
होडी अन् शिडाच्या नात्यासारखी